बँकेची स्थापना
बँकेची स्थापना
चिपळूण शहरातील आणि आजुबाजूच्या जनतेस सहकारी चळवळीचे मार्फत काटकसर करण्यास उत्तेजन देऊन त्यामधून निर्माण होणारा पैसा लहान सहान उद्योग धंदेवाहिकास तसेच व्यापाऱ्यास आणि सामान्य जनांस जरुरीप्रमाणे कर्जाऊ देणे शक्य व्हावे आणि चिपळूणच्या जनतेस आधुनिक बँकिंगच्या सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हि बँक सन १९३३ मध्ये स्थापन करण्यात आली. बँकेच्या स्थापनेबाबत विचार करण्याकरिता लक्ष्मी बिल्डिंग येथे दिनांक ३१/८/१९३३ रोजी चिपळूणचे त्यावेळचे मामलेदार श्री कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होऊन बँक स्थापन करण्याचे ठरले. त्या सभेस रत्नागिरी सेन्ट्रल का-ऑप. इंस्टीट्युटचे प्रचाराधिकारी श्री ग. वी. भाटवडेकर हे त्या बाबतीत जरूर ती माहिती आणि सल्ला देणेसाठी उपस्थित होते.बँक स्थापन करण्याचे त्या सभेत ठरल्यानंतर कै. डॉ. गो. के. पाटणकर, श्री शंकरराव शिंदे, श्री शांतारामशेठ तांबट व कै. विनायकराव गांधी यांनी त्यावेळी बाजारात फिरून रु. ८००/- चे प्राथमिक शेअर भांडवल गोळा केले आणि कै. श्रीमान काशिरामशेठ रेडीज व त्यावेळचे नगराध्यक्ष श्री बी. जी. खातू वकील यांचे पुढाकाराने दिनांक २/९/१९३३ रोजी बँकेचे रजिस्ट्रेशनचे कागद रवाना करण्यात आले. दिनांक ३१/१०/१९३३ रोजी बँक रजिस्टर झाली व तिची पहिली सर्व साधारण सभा दि. ४/१२/१९३३ रोजी त्यावेळचे चिपळूणचे सब जज्ज श्री. खाडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली होऊन बँकेचे कामास सुरुवात झाली.